आनंद इंजेगावकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आनंद इंजेगावकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

जेव्हा त्यांना...। मराठी कविता। Marathi Kavita |

जेव्हा त्यांना तुमच्या
संसदेवर राज्य करायचं असतं
तेव्हा पैदा करतात तुमच्यात ते
दलाल भडवे चमचे आणि
गोतास काळ होणारे कुऱ्हाडीचे दांडे
जेव्हा त्यांना तुमच्या
अर्थव्यवस्थेवर राज्य करायचं असतं
तेव्हा लादतात ते तुमच्यावर
न्यू इकॉनामिक पॉलिसी
दावतात रोजगाराचे गाजर आणि
पकडतात ससे टाकून वाघर
जेव्हा त्यांना तुमच्या
मनावर राज्य करायचं असतं
तेव्हा ते तुमच्या
रंध्रारंध्रात सोडतात पोथ्यापुराणातील विषाणू
धर्मग्रंथातील किटाणू
गलोगल्ली देतात देवळांची अंडी आणि
सत्संगात पकडतात मासे
त्यांच्या खमंग रस्यासाठी
जेव्हा त्यांना तुम्हाला
समजू द्यायची नसते व्यवस्था
तेव्हा लावतात ते चंगळवादाची चटक
चढवतात भोंगळवादाची धूंद
विरोधी बाकावरल्यांनाही देतात ते
हा काल्याचा प्रसाद आणि
नाचवतात हिजड्यासारखे
घुंगरं बांधून पायात...
                       प्रा. डॉ. आनंद इंजेगावकर
               'सरनामा' लोकाशा नगर,जिंतूर रोड,
                                  परभणी.

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

लाथा खेटरांच्या । मराठी कविता । Marathi Kavita

लोकशाही संविधान । शब्द केले छोटे
घातले यांनी वाटे । देशाचे माझ्या ।।

सत्ता संपतीची बघा। विषम वाटणी
महालात दाटणी । विलासाची ।।

बळकावले यांनी । जमिनजुमले भूखंड
खेळून कळवंड । संसदेत ।।

खुराक गुराढोरांचा । अन्नसुरक्षा म्हणती
जनलोका बनविती । नपुंसक ।।

पक्वानाच्या राशी । खाऊन घोरती
फुगून मरती । गाढवीचे ।।

देशद्रोहीच असे । उंबऱ्यापर्यंत लांबलेले
सज्जन डांबलेले । तुरूंगात ।।

शेंबडे कार्टे यांचे । सिंहासनी बसे
देशाचे मग कसे । टंबरेल वाजे ।।

हवापालटास यांच्या । परदेश वाऱ्या
वाजविला यांनी बोऱ्या । तिजोरीचा ।।

कालचे लुंगीवाले । आज मालामाल
करुन हालाहाल । बकऱ्यांचे ।।

कसाईच सगळे । खादाड यांच्या जाती
संडासही खाती । आनंदाने ।।

जगणेच यांचे । पैषाला समर्पित
नोटांच्याच थप्पीत । फुक्का यांना ।।

प्रजासत्ताकाच्या नावे । परिवाराची सत्ता
घाला यांना लाथा । खेटराच्या ।।

                     प्रा.डॉ.आनंद इंजेगावकर
          'सरनामा' लोकाशा नगर,जिंतूर रोड,
                               परभणी.