सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

शिर्डीचे साईबाबा


आपली मनोकामना पूर्ण व्हावी या आशेने साईबाबांना साकडे घालण्यासाठी समस्त जातिधर्माचे लोक हजारोंच्या संख्येने जिथे येतात ती साईबाबांची शिर्डी. बाबा जणूकाही एखादी जादूची कांडी फिरवतील आणि आपले संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल अशी आशा बाळगून येणारे लोक बाबांचा आशीर्वाद घेऊन तृप्त समाधानी मनाने इथून परत जातात. परिपूर्ण श्रद्धेचे स्थान म्हणून शिर्डी ओळखली जाते.
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथमहाराज जे आज साईबाबा म्हणून ओळखले जातात त्यांचे समाधिस्थान शिर्डी. साईबाबा एक फकीर होते. ते तरुणपणी शिर्डी येथे आले आणि जवळपास साठ वर्षे इथेच राहिले. ते ज्ञानी होते. लौकिक जगातील कोणत्याच इच्छा त्यांना नव्हत्या. दैवी चमत्कार करण्याची ताकद त्यांच्यात होती. ते योगी होते आणि अनेक प्रसंगी त्यांनी दैवी चमत्कार घडवले होते. साईबाबांचे फकिराचे साधे आयुष्य पण अनेक जीवन मूल्यांनी परिपूर्ण. त्यामुळे त्यांचा भक्तपरिवार वाढत गेला.
आधी साईबाबा शिर्डी गावाबाहेर निंब वृक्षाखाली ४-५ वर्षे राहिले. या स्थानाला गुरुस्थान असे म्हणले जाते. द्वारकामाई इथे एका भिंतीवर फक्त हार घातला आहे. इथे कोणाचीही मूर्ती किंवा प्रतिमा नाही. द्वारकामाई/ बहिष्कृत मशीद, जिथे त्यांनी झाडे लावली ती लेंडी बाग या सगळ्या ठिकाणी प्रार्थनाकरून बाबांचे भक्त आशीर्वाद घेतात. साईबाबांनी शिकवलेली मूल्ये अंगी बाणवली तर परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग अजून सुकर होतो हीच शिर्डीची शिकवण आहे. साईबाबा सर्व धर्म समान मानत असत आणि त्यांनी प्रेम व दया असा मोठा वैश्विक धर्म स्थापला होता. मोठ्याप्रमाणावर जे भक्त इथे दर्शनासाठी येतात ते हाच धडा घेऊन जातात.
असे म्हणतात की दरदिवशी सुमारे ७०,००० ते ७५,००० लोक साईंच्या दर्शनासाठी इथे येतात. गुरुवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी तर हा आकडासहज लाखावर जातो. श्री साईबाबा संस्थान न्यास (ट्रस्ट), शिर्डी यांनी भक्तांच्या निवासाकरता सोय केली आहे. इथे दररोज सुमारे ४० हजार लोकांची रुचकर जेवणाची सोय वाजवी दरात होते. साध्या आणि शांत आयुष्याचा अनुभव इथे आल्यावर घेता येतो. साईबाबांचे समाधिस्थळ हे अत्यंत पवित्र स्थळ आहे. मंदिराच्या मुख्य इमारतीचे काम साईबाबांचे निस्सीम भक्त नागपूरचे श्री गोपाळराव बुट्टी यांच्या सहाय्याने झाल्याने या भागाला 'बुट्टीवाडी' असेही म्हणतात. मंदिराचे बांधकाम दगडी असून मुख्य समाधिस्थळ व साईबाबांची मूर्ती ही पांढऱ्या संगमरवराची घडवलेली आहे. अंदाजे ६०० भक्तांना एकावेळी बसता येईल असा विस्तृत सभामंडप मंदिरासमोर बांधला आहे. स्वतः साईबाबांच्या वापरातील काही उपलब्ध वस्तुंचा संग्रह मंडपात केला आहे. पहिल्या मजल्यावर साईबाबांच्याआयुष्यातील काही प्रसंग दाखवणारी चित्रे आहेत. या मंदिराचा परिसर अंदाजे २०० चौ. मी. इतक्या क्षेत्रावर पसरलेला आहे. मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे. बाबांशी संबंधित चित्रे आणि पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रसादवाटपाची स्वतंत्र सोय एका जागी केलेली आहे. मुख्यमंदिराच्या शेजारीच ध्यानधारणेसाठी एक वेगळे सभागृह बांधले आहे.
अंतर : मुंबई पासून २४२ किलोमीटर
कसे जाल ?
रस्ता 
शिर्डीपासून कोपरगाव १५ कि.मी., अहमदनगर ८३ कि.मी., मनमाड ८७ कि.मी., नाशिक ११९कि.मी., अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या, इतर राज्यांच्या आणि अनेक खाजगी बसगाड्यांचे पर्याय इथे येण्यासाठी उपलब्ध आहेत.
रेल्वे
साईनगर-शिर्डी हे मार्च २००९ मध्ये सुरु झालेले रेल्वेस्थानक शहरापासून २ कि.मी. वर आहे. मुंबई, चेन्नई, विशाखापट्टणम (सिकंदराबाद-मैसूर-इत्यादि शहरांमार्गे) इथून शिर्डीस येण्यासाठी रेल्वेची सोय आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा