सोमवार, १६ एप्रिल, २०१८

मनुस्मृतीची बदनामी ब्राह्मणांचे पाप भाग 1

मनुस्मृती, असा एक ग्रंथ ज्याच्याविषयी अनेक वाद आहेत. मनू आणि मनुवाद ही आज शिवी बनली आहे. मनूवर आधारलेले राज्य परत यावे, असा विचार करणे मूर्खपणाच ठरेल; कारण कालौघात त्यापेक्षाही उत्तम सक्षम आणि कालसुसंगत अशी न्यायी व्यवस्था अस्तित्वात आली आहे. मात्र शेकडो- हजारो वर्षांपूर्वी (येथे कालगणनेत अडकून पडायचे नाही) जी व्यवस्था आणली गेली होती. त्या व्यवस्थेचा निटसा अभ्यास न करता (हा आक्षेप मनुस्मृतीच्या समर्थकांना देखील लागू पडतो) एका ग्रंथाचे विश्लेषण केले गेले. नुसतेच विश्लेषण नाही तर त्यासाठी एका धर्माला दोष देत एक जातीवर्ग देखील आजही मनुवादी म्हणजे शोषक असल्याचे सांगितले जाते. त्यासाठीच संस्कृत अभ्यासकांच्या मदतीने मनुस्मृती जशी समजली तशी मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
यात व्यक्त झालेली मते आपल्या सगळ्यांना पटतीलच असे नाही. अगदी मनुविरोधकांना आणि मनूसमर्थकांना देखील यावर आक्षेप असणे स्वाभाविक आहे. आपल्या सूचनांचे स्वागतच आहे. सामाजिक दरी वाढविणारा एक विषय समजावा, आणि आपल्याला समजलेला विषय इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा इतकाच हेतू यामागे आहे.
मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. ब्रिटीश काळात इ.स.१७९४ इंग्रजी भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ. याच्यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला. जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठलाही ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. तसा दावा करणेही योग्य नाही. जी जी म्हणून धर्मग्रंथ मग ती कोणत्याही धर्माची असू देत ती ती सर्वार्थाने परीपूर्ण आहेत असा दावा एखादा आंधळा अनुयायीच करू शकतो. स्थळ, काळ, स्थिती परत्वे परिस्थिती बदलत राहते आणि त्यात बदल होत राहतो. आपण आपल्या संविधानात देखील संशोधन करत राहतोच. तसेच मनुस्मृति परिपूर्ण नाही. मनुस्मृतीचे समिक्षण त्याची कालसुंसगतता तपासत त्यात संशोधन बदल होणे अपेक्षीत होते मात्र ते देखील घडले नाही.
मनुस्मृति प्राचिण ग्रंथ आहे. श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल. सांगितली आणि लक्षात ठेऊन ती पुढच्या पिढीला परत सांगितली असे तिचे स्वरूप आहे. आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट) मनुस्मृतित स्थान मिळाले असेल. तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल.
मनुस्मृतीच्या आज ५० हून अधिक प्रती उपलब्ध असून त्यातील कोलकाता येथील इ.स.१८ व्या शतकातील प्रत अधिकृत मानली जाते.
मनुस्मृतीतील छंदबद्ध रचनेवरून ती इसविसन पूर्व २ रे शतक ते इ.स.३ रे शतक या काळातील असावी. मनुस्मृती हा मनू आणि भृगु यांतील धर्मावरील संवाद आहे. यात कर्तव्ये, आचार, गुण, नियम व अधिकार इ. बाबतीत चर्चा आहे. मनुस्मृतीचा प्रसार भारताबाहेर म्यानमार, थाईलंड, कंबोडिया आणि इंडोनेशिया मध्ये देखील झाला होता. मनुस्मृतीला मानव धर्मशास्त्र असेही ओळखले जाते.
मनुस्मृतीमध्ये एकूण १२ अध्याय असून त्यात २६८३ श्लोक आहेत. ब्रह्मदेवाने उत्पन्न केले असलेले धर्मशास्त्र मनूला मिळते. तो ते ऋषींना सांगतो. असे यात लिहिले आहे.
श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे-
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं| विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेब्रवीत्||
अर्थात, श्रीकृष्ण म्हणतात, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला
मनुस्मृती समजण्यापूर्वी पहिल्या दोन भागात सामाजिक बदल आणि मनुस्मृतीवरील आक्षेप समजून घेऊ.   
सोऴाव्या शतकात युरोपीयन समुदाय व्यापाराच्या निमित्ताने भारतात येऊ लागला होता. जिथे शक्य आहे, अशा ठिकाणी आपल्या लष्करी छावण्या उभ्या करत संस्थानं आणि वेगवेगळी सत्ताकेंद्र असलेल्या भारतात त्यांना आपलं बळ उभा करणे सहज शक्य होते. कर संकलन आणि कच्चा माल असा दुहेरी उपयोग भारतभूमीचा होऊ लागला. जो आला तो स्थिरावू लागला आणि हे सोडून जाण्याची त्यांची इच्छाच नव्हती. डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटीश असे या देशात स्थिरावू लागले. पुढे पुढे ब्रिटीशांनी आपले चांगलेच बस्तान बसवले. डच, फ्रेंच परत गेले. पोर्तुगीज काही भूभागापूरते मर्यादीत राहिले. ब्रिटीशांनी मात्र आपले साम्राज्य विस्तारले. सोळाव्या शतकात भारतात आलेले हे व्यापारी पुढे अठराव्या शतकात या देशाचे शासक बनले.
युरोपियन लोकांचे धार्मिक अधिष्ठान ख्रिश्चन धर्म होते. परंपरावादी तरीही वैज्ञानिक  दृष्टी असलेल्या युरोपियन समुदायांनी त्यांचा एकेश्वरवाद पुढे करत ईथल्या देव आणि देवतांची धार्मिक परंपरांची टिंगल उडवायला आणि त्याला चुकीचे ठरवायला सुरुवात केली. अतीशय भडक स्वरूपात भारतीय परंपरा जगाला सांगत भारतात फक्त गोंधळ आहे असे भासवायला सुरुवात केली. याच काळात सेवाव्रत घेऊन आल्याचे दाखवत मिशनरी देखील धर्मांतरासाठी आपली पाये रोवत होती. हे मिशनरी आपल्या सत्ता आणि संपत्तीच्या बळावर इथल्या परंपरा आणि धर्मांना वेडगऴ आणि चुकीच्या ठरवत होतीच. पाश्चात्त्य विचारवंतांनी आपल्याकडच्या संस्कृतीवर मांडलेला विचार ईतका प्रभावी ठरला की आजही अनेकजण त्याच विचारांनी झपाटून सुव्यवस्था बाहेरून आणली पाहिजे असे सांगत आहेत.
यानंतर अमेरिका वसाहतवादातून मुक्त झाली, आणि नव्या विद्यापिठीय ज्ञानाची पध्दत तेथे सुरू झाली. याच काळात तिथे संरजामशाही असलेल्या कथॉलिक ख्रिश्चन विचारधारेला प्रोटेस्टंट पंथाने नाकारले होते. आणि विज्ञानवादी दृष्टिकोण धर्मश्रध्दा नाकारत होते. याच भूमिकेतून ते पूर्वेच्या धर्माकडे बघत होते. त्यांनी हिंदू धर्माला खलनायक ठरवत हिंदूंना शोषीत माणायला आणि तसे सांगायला सुरुवात केली. स्वतःला हिंदूचा तारणहार किंवा उध्दारकर्ता असं मानू लागले.
रामायण, महाभारत हे पुरुषसत्तावादी महाकाव्य ठरू लागले. राम प्रेमळ राजा यापेक्षा पत्नीला छळणारा आणि साम्राज्यवादी खलपुरुष मांडल्या गेला. क्षीरसागरात बायकोला पाय चेपायला लावणारा विष्णु पुरूषसत्ताक माणसिकतेचे प्रतीक बनवल्या जाऊ लागला. याला हिंदू मुलतत्त्ववाद  असे नाव देत पश्चिमेकडील विद्वानांनी भारतीय परंपरा आणि प्रतीकांची यथेच्छ नालस्ती केली. याला संशोधनाचे रूप दिले.
भारताकडे कांहीच नाही, आहे तो फक्त संभ्रम आणि गोंधळ अशी प्रतिमा निर्माण करण्यात ते य़शस्वी ठरत गेले. या नियोजनबध्द आक्रमनाला भांबावलेला भारतीय हिंदू पोपटाच्या भयसापळ्याप्रमाणे अडकत राहिला. आपली संस्कृती व परंपरावर होणारे आक्रमण बघता तो या परंपरांना अधिक घट्ट चिटकू लागला. या आक्रमणाची प्रतिक्रीया म्हणून तो आपल्या धर्मपालनात आंधळेपणाने आक्रमक झाला. यात परत पाश्चिमात्य  विचारवंतांचे फावले. आक्रमक होत आमचा धर्म असाच आहे, तो चांगला आहे असे सांगणा-या लोकांना खलपुरूष ठरवत त्यांनी कांही लोकांना आपल्याबाजूने ओढण्यात यश मिळवले. स्वार्थी विरोधक आणि आंधळे अनुयायी यांनी हिंदू संस्कृती बदनाम केली आणि त्याचा प्रभाव आजही दिसतो आहे.

लक्ष्मी विष्णुचे पाय चेपते हे पुरुषी वर्चस्व असेल तर, शिवाच्या छातीवर उभी राहणारी काली स्त्रीवर्चस्व मानावी लागेल. आपल्या अक्राळविक्राळ रूपात जगाला जीभ दाखवत दुष्टांना भयचकित आणि चित करणारी कालीची प्रतिमा स्त्री सबला आहे, हे सांगणारीच होती. शिव अर्धनारी नटेश्वराच्या रूपात दिसतो. तर भगवान विष्णू मोहिनीरूप धारण करतात, ही कशाचे द्योतक आहेत. हिंदू पुराणातील कथा, प्रतीके आणि कर्मकांड या नातेसंबंधाविषयी खूप कांही सांगत जातात. आपण त्यातून तात्पर्य काढायचे असते याचा विसर आपल्याला पडला. निसर्गतः जी माता आहे. सांस्कृतिक अर्थाने जी दुहिता आहे, मानव जातीची निर्माती आहे, ती माणुसकीची निर्मिती आहे. तीच असते ज्ञान, तिच असते शक्ती आणि तीच असते संपत्ती. मग तीच ठरते सरस्वती, दुर्गा आणि लक्ष्मी या रूपांना आणि प्रतिकांना समजून न घेता वर म्हटल्याप्रमाणे भयसापळ्यात अडकलेल्या पोपटांनी आपल्या ज्ञानाची पोपटपंची करत धर्म टिकविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आपले महत्त्व अबाधित राहील हा स्वार्थी हेतू ठेवला, त्यातूनच या अफवा आणि गैरसमज निर्माण झाले.

वामन आणि बळीची कथा अशीच; तिच्यातील प्रतीकं समजून न घेता दोन कथानायकांना दोन जातीचे प्रतिनिधी करत द्वेश हिणत्वाची भावना निर्माण करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. ही कथा खरेच घडली असेल का? आणि आणि निर्माण झाली असेल तर कशासाठी? याचा शोध घ्यावाच लागेल. अभ्यासक म्हणून नाही मात्र वाचून जे समजते त्यातून तर असे वाटते की, हे जग मर्यादित असले तरी मानवी संसाधने अमर्यादीत आहेत. मानवाच्या अडचणी आणि गरजा या वस्तु देऊन कोणीच सोडवू शकत नाही. त्यासाठी माणसाने आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला हवे. आपल्या विचारांचा परीघ रुंदावेल तेंव्हाच त्याला गरजा, भय ओळखता येइल आणि इतरांच्या या गरजा आणि भय याविषयी त्याला सहानुभुती दाखवता येईल. हे असे करणेच खरा मानवता धर्म असतो. वामन आणि बळी हे दोघेही कथापात्र हाच संदेश देण्यासाठी योजिलेली असावीत. आपणच त्यांना जातीचे प्रतिनिधी करण्याच्या षड्यंत्राला बळी पडलो.
ख्रिश्चन मिशनरी वर्गाला जपानने आपल्या देशातील महारोग्यांची सेवा करण्यासाठी भूखंड नाकारला. जेवढे म्हणून कांही  बौध्द देश आहेत तिथे मिशनरी वर्गाला प्रवेशच दिला नाही. चिनमध्ये मदर तेरेसा यांना थांबू दिलं गेले नाही. त्या भारतात आल्या स्थिरावल्या आणि भारतरत्न झाल्या. ख्रिश्चन मिशनरी वर्गाला भारतात मात्र मोकळे रान मिळाले आणि त्यांनी आपले काम केले.
भारतातील सततच्या युध्दात अनेक क्षात्रवीर मारले गेले. भारताचे क्षात्रतेज क्षीण होत असताना ब्राह्मण्य देखील बदलू लागले. अस्थिर राज्यात स्वतःला स्थिर आणि सक्षम करण्याच्या प्रयत्नात ब्राह्मण आपले कर्तव्य विसरून गेले आणि कर्मकांडांना घट्ट चिटकत तोच सुटकेचा मार्ग समजू लागले. याच काळात देशात ( ईसविसन 300 पासून) बौध्दमताचा प्रसार सुरू झाला होता. धर्मरक्षण म्हणजे यज्ञयागादी कार्य, असाच समज रूढ झाला. लोककल्याण याऐवजी स्वकल्याण याला अधिक महत्त्व आले. पुढे पुढे पश्चिमेकडील मुस्लीम आक्रमक वाढली. क्षात्रतेज क्षीण झाले. तर ब्राह्मण आपला वर्ण श्रेष्ठत्वाचा दूर्गूण सोडायला तयार नव्हते.
मनुस्मृतीच्याच श्लोकाचा दाखला द्यायचा तर
परित्येजेदर्थकामौ यौ स्यानां धर्मवर्जितो।
धर्मं चाप्यसुखोदर्कं लोकसंकुष्टमेवच।।
अर्थात धर्माला विरोधी असणा-या अर्थाचा आणि कामाचा त्याग करावा. जे आचरण लोकांमध्ये आक्रोश निर्माण करते व त्याचा परिणाम दुःखात होतो तो धर्म असला तरी वर्ज्य करावा.
नेमकी हीच शिकवण मनूचे अनुयायी विसरले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आपले वर्तन ठेवू लागले. ब्राह्मण आचारभ्रष्ट झाला आणि कर्मकांडांत गुंतला. कौशल्याचा वापर करत उदरनिर्वाह करणा-या शुद्रांवर गुलामीचे जिणे आले. परकीय आक्रमक या दुहीचा फायदा घेत होते. क्षात्रधर्म क्षीण झाला होता. ब्राह्मण्य आचारभ्रष्ट झाले होते. व्यापारातील नैतिकता संपुष्टात येत होती. आणि परकीय आक्रमकांना ही आदर्श स्थिती निर्माण होऊ लागली होती. पहिले गुलाम बनवत कांही आक्रमकांनी राज्य केले. त्यानंतर इंग्रजांनी हा जातीय द्वेष खोलवर रुजेल याची व्यवस्था केली आणि भारत जातीपातीत विखुरला गेला. जातीपातीच्या भिंती भक्कम होत होत्या.
त्याचा परिणाम म्हणून भारतात आज अनेक वादप्रवाद चालू आहेत. त्यासोबत अनेक संकटे देखील आहेत. कट्टरतावाद, नैतिक अपराध, माहितीच्या विस्फोटासोबत भ्रामक माहितीच्या आधारावर तयार झालेली संभ्रमित अवस्था. स्वच्छताविषयक अनास्था, अनारोग्य यासोबतच भ्रष्टाचार, दहशतवाद या समस्यांनी देखील आपले जाळे पसरायला सुरूवात केली आहे. धार्मिक व जातीय भावना अधिक टोकदार होत आहे. जन्मासोबत मिळणारी जात आणि लिंगभेद या आणखी कांही समस्या या काळात वाढल्या आहेत. जात आणि लिंगभेद या समस्यांनी तर देश मोठ्या संकटात जात आहे.
या सगळ्या समस्या कोणत्या एका धर्मात नाही, तर सगळ्याच धर्माच्या सांस्कृतिक समस्या होऊन बसल्या आहेत. लिंगभेद ही वर्षानुवर्षापासून जागतिक स्तरावरची अडचण आहे. तर जातिप्रथा ही आशिया त्यातही दक्षीण आशियातील समस्य़ा आहे. या  भागातील सगळ्याच धर्मात ही अडचण जाणवेल. पण, त्यातही हिंदू धर्म सगळ्यात जुना असल्याने या कुप्रथांचे खापर हिंदू धर्मपध्दतीवर फोडले गेले. याच कुप्रथांना आपण चालवत राहिलो तर एक दिवस हा देश धार्मिक आणि जातीय तुकड्यात अधीक तीव्रतेने विखुरला जाईल.


लेखक-- सुशील कुलकर्णी

सोमवार, २ एप्रिल, २०१८

शेतकरी – अन्नदाता कि विषदाता ?



हा लेख कदाचित कडू वाटेल, पण – एका सामान्य माणसाच्या मते - हे सत्य आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही त्यामुळे माझ्यावर कोणी नाराज होऊ नये.. हि विनंती.

आपल्या देशात अनेक मान्यवर शेतकरी बंधू उत्तम प्रकारे आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करून देशाच्या आणि पर्यायाने समाजाच्या उत्कर्षाला हातभार लावत आहेत. अनेक जणांना पूर्वीच्या चुकांची जाणीव होऊन ते नैसर्गिक शेतीच्या मागे येत आहेत..... त्यांच्या साठी खालील लेख अजिबात नाही.

 आपल्या मनात आज "शेतकरी" म्हटल्यावर आज जी प्रतिमा निर्माण होते अश्या प्रकारच्या शेतकऱ्यांबद्दल हा लेख आहे.

----------------------

काही उदाहरणे पाहू.

मी लहानपणी सायकल भाड्याने घेऊन शिकलो. तेव्हा सायकल भाड्याने देणे हा एक व्यवसाय होता. हळू हळू लोकांनी सायकल स्वतः विकत घेणे चालू केले आणि सायकल भाड्याने देणे हा व्यवसाय कमी होत गेला. काही सायकल वाल्यांनी त्याच्या व्यवसायात बदल केला आणि सायकल विक्रीचा व्यवसाय सुरुकेला , काही जणांनी सायकलला सुशोभित करण्यासाठी लागणारे  साहित्य विकायला सुरुवात केली. पण काही जणांनी मात्र पूर्वीचाच व्यवसाय चालू ठेवला आणि कमी होत जाणाऱ्या व्यवसायाकडे दुखी मनाने पाहत राहिले.

टायपिंग चा व्यवसाय , STD-PCO चा व्यवसाय यासारखे अनेक व्यवसाय काळाच्या ओघात बदलत गेले. काही लोकांनी काळानुसार स्वतःला बदलले तर काही जन कालाय तस्मै नमः म्हणत रडत बसले. हीच गोष्ट मोठ्या व्यवसायात देखील आढळते. एकेकाळी जगावर राज्य करणारा नोकिया हा मोबाईलचा ब्रांड, technology मध्ये झालेल्या बदलाला वेळीच सामोरे न गेल्याने आपटला. Videocon , LG यासारखे भारतात क्र.१ आणि २ वर असणारे TV चे ब्रांड देखील LED / LCD technology आल्यावर खालावले. त्यांची जागा अन्य कंपन्यांनी बळकावली.

अशी अनेक क्षेत्रातली अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. सर्वांचा सारांश एकच. व्यवसाय करतांना आपल्याला काळाप्रमाणे बदलावे लागते ,नाहीतर आपणच आपल्या पतनाला जबाबदार असतो. दुसरे कोणी नाही. आपण व्यवसायात चुका केल्या तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात.

शेती हा एक व्यवसाय आहे आणि त्याला व्यवसायाचीच तत्वे लागू होतात. हि तत्वे निसर्ग नियम आहेत आणि कोणीच त्याला बदलू शकत नाही. सरकार फक्त त्यासाठी साह्यभूत होऊ शकते इतकेच.

सध्या शेतकऱ्यांना बिचारे म्हणण्याची एक मोठी स्पर्धाच देशात लागली आहे. शेतकरी म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येते ? 
प्रचंड सुकलेली जमीन , त्यावर उघड्या अंगाने आकाशाकडे पहात बसलेला शेतकरी. आणि मग शेतकर्याला बिचारे ठरवण्याची भुमिकाच देशात लागून गेली आहे.शेतकऱ्यांना प्रगती करण्यासाठी काय तर कर्ज माफ करा, वीज बिल माफ करा .. समजा केले तर पुढे काय ? त्याचा व्यवसाय सुरळीत होईल का ? पुन्हा कर्ज आणि पुन्हा कर्जमाफीच्या मागण्या , मोर्चे , धिक्कार , शिव्या वगैरे, वगैरे .. 

एक सामान्य माणूस म्हणून शेतकरी एक भिकारीच वाटायला लागला आहे. किंबहुना हि प्रतिमा उभी करण्यात राजकीय पक्ष, मिडिया आणि स्वतः शेतकरी जबाबदार आहेत. शेतकऱ्याला मी किती जास्त केविलवाणा दाखवतो अशी स्पर्धा चालू आहे. आणि शेतकरी देखील, कर्ज माफ होईल, वीजबिल माफ होईल असे कोणी म्हणले कि त्याच्यामागे झेंडा घेऊन जायला तयार !

खालील मोठ्या चुका शेतकऱ्यांकडून, राजकीय पक्षाकडून आणि कृषी शास्त्रज्ञांकडून होत आहेत.

१ – हजारो वर्षापासून आपल्या देशात शेतीचा व्यवसाय होत आहे आणि तरी सुद्धा आपली जमीन स्वातंत्र मिळेपर्यंत उपजाऊ राहिली आणि गेल्या ७० वर्षात असे झाले कि हजारो वर्ष तग धरलेली आपली जमीन ७० वर्षातच सुमारे ६० टक्के पर्यंत नापीक झाली ? या गोष्टीला प्रथम सरकार आणि त्या काळातले कृषी शास्त्रज्ञ जबाबदार आहेत. स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्या देशात गायीच्या / बैलाच्या शेणाचा वापर खत म्हणून होत होता.ज्यासाठी काही खर्च नव्हता. जमिनीचा कस टिकून रहात होता. बियाणासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नव्हती.जगभरात सर्वोत्कृष शेतकी पैदावार असलेल्या आपल्या देशात  स्वातंत्र्यानंतर रासायनिक खते आणि फवारणी कोणी आणि का आणली ?  
रासायनिक खतांचा दुष्परिणाम जमिनीवर आणि पिकांवर काय होईल याचा अंदाज घेण्याइतकी हुशारी देशात नव्हती का ? 
कि बाहेरून आलेले ज्ञान ते चांगले आणि आपले ते मागासलेले हि वृत्ती तेंव्हाच्या शास्त्रज्ञांमध्ये देखील होती. 
कि कळत असून देखील हे शास्त्रज्ञ धृतराष्ट्राची भूमिका घेत होते ?
तेंव्हा मी या लेखाद्वारे हजारो वर्षांची आपली भू संपदा ७० वर्षात नासवणार्या आणि तत्कालीन सरकारच्या धोरणांना आंधळेपणाने पाठींबा देणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांचा तीव्र धिक्कार करतो.शेतकऱ्यांना तर काय बोलावे ? रासायनिक खतांच्या वापरानंतर ३-४ वर्षात कमी होत जाणारे पिक , वाढलेली कीड , खतांवर वाढत चाललेला खर्च या सर्व गोष्टींची दखल घेणे असे करायला शेतकरी डोकेबाज थोडी आहे ? तो तर आपला बिचारा , गरीब , दिन दुबळा वगैरे वगैरे ... वर सायकल च्या व्यवसायाचे उदाहरण आठवते ? व्यवसायात डोके नाही वापरले , बुद्धी गहाण ठेवली तर व्यवसाय बुडणार हे नक्की.   

२ – स्वातंत्र्यानंतर काही वर्षातच , दुग्ध क्रांती या गोंडस नावाखाली  आपण देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली देशी गाय नासवली. कुठलेही डोके न वापरता , बाहेरच्या संशोधनाला श्रेष्ठ मानून , स्वतःला मागासवर्गीय समजणाऱ्या सरकारने आणि तत्कालीन शास्त्रज्ञानी परदेशातून मोठ्या प्रमाणात डुक्करसदृश्य जर्सी, होल्स्तेन या प्राण्यांचे वीर्य आयात करून देशी गायींशी संकर करून नवीन प्राण्याची निर्मिती केली. आपण आज जे दुध गायीचे समजून पीत आहोत , ते सर्व जर्सी प्राण्याचे दुध आहे.जेंव्हा न्यूझीलंड मधील कीथ वूडफोर्ड या शास्त्रज्ञाने संशोधन करून सिद्ध केले कि या दुधाचे पचन होत असतांना बिटा केसो मोर्फिन नावाचा अमली गटातील पदार्थ तयार होतो. म्हणजेच आपण जर्सी गायीचे ( प्राण्याचे) एक कप दुध पितो तेंव्हा काही microgram मध्ये अमली पदार्थाचे सेवन करतो. यावर जगात ९७ वेळा संशोधन झाले आणि हाच निष्कर्ष निघाला. अनेकदेशात या दुधावर बंदी आहे, अनेक देशात या दुधाचा प्रकार ( A-1 किंवा A-2 ) पिशवीवर लिहिण्याचे बंधन आहे. पण आपण अजून झोपलेलो आहोत. या गोष्टीला देखील हि कल्पना अमलात आणणारे सरकार आणि तत्कालीन शास्त्रज्ञ जबाबदार आहेत.शेतकऱ्याकडून तर डोके वापरण्याची अपेक्षाच चुकीची आहे.

३ – वरील दोन कारणांमुळे आपल्या देशातील सुमारे ७० टक्के जनता आज आजारी आहे. आपल्या १० नातेवायीकांची यादी करा आणि पहा. थोड्याफार फरकाने , आपल्याला हेच आढळेल. जर्सी प्राण्याचे दुध आणि विषयुक्त अन्न आज देश खातो आहे. माफ करा पण याला शेतकरी कळत नकळत जबाबदार आहे. डोके न वापरता जमेल तेवढे रासायनिक खत ओतायचे, पिकांवर, फळांवर लवकर पिकण्यासाठी दणकून विषाची फवारणी करायची आणि पैश्याच्या मागे लागायचे ! स्वतःच्या कुटुंबियांना दुध देण्यासाठी एखादी देशी गाय पाळायची आणि बाकी सर्व जर्सी प्राण्याचे दुध विक्रीसाठी काढायचे ! लक्षात ठेवा लहान मुलांना देखील आज आम्हाला हे विषयुक्त अन्न खाऊ घालावे लागतेय. आम्हा लोकांसाठी तर काय , आभाळच फाटले आहे, सर्वत्र विषारी अन्न , काय करणार ? याला शेतकरीच जबाबदार आहे. गायीचे दुध आम्ही विश्वासाने , गायीचे दुध म्हणून म्हणून पितो , पण ते अमली द्रव्य असते , याला शेतकरीच जबाबदार आहे. आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसतात पण लाखो लोकांचा विषयुक्त अन्नामुळे अकाली झालेला मृत्यू कोण पाहणार ? कदाचित शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला हा अव्यक्त तळतळाट च कारणीभूत असेल कदाचित ! या शेतकऱ्यांना अन्न दाता म्हणावे कि विष दाता हेच समजत नाही.

४ – प्रत्येक सरकार च्या काळात काहीना काही योजना शेतकऱ्यांसाठी आखल्या जातात. राजकीय पक्षांना जर खरच शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. उदा. यासरकारने कर्ज माफी केली. लाखो शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली पण अनेक शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे कि त्यांना ONLINE ENTRY करणे जमत नाही. काही गावात एक प्रयोग झाला.प्रत्येकी ५० रुपये देऊन ONLINE ENTRY करून देण्याचा व्यवसाय काही जणांनी वैयक्तिक पातळीवर सुरु केला. हि एक अत्यंत चांगली कल्पना आहे. ५० रुपये देणे शेतकऱ्यांसाठी जड नाही , आणि ते देखील कर्ज माफ होत असेल तर ! आणि नुसते सरकारचा धिक्कार करत मोर्चे काढण्यापेक्षा त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात मदत केली तर ती खरी मदत होईल. नाही तर प्रत्येक वेळी शेतकरी नेहमी विरोधी भूमिकेतच उभा केला जातो. अर्थात , समाजातील अनेक मंडळीनी (उदा.नाना पाटेकर. हे प्रसिद्ध नाव आहे म्हणून, पण त्यांच्यासारखी अनेक मंडळी)  ज्याप्रमाणे स्वतः जमिनीवर उतरून प्रत्यक्ष मदतीस सुरुवात केली. त्यांच्या पेक्षा आंदोलन करण्यार्या आणि त्यास प्रोत्साहन देणाऱ्या राजकीय पुढार्यांकडे कितीतरी जास्त संपत्ती आहे. पण ही नेते मंडळी शेतकऱ्यांना भडकावण्यातच धन्यता मानतात. असो.  आणि शेतकरी म्हणजे शेतकरी च ! डोके वापरता येत नाही म्हणून तर त्याच्या व्यवसायाची हि अवस्था झाली आहे. त्यामुळे अशी मंडळी तर कुणी कर्ज माफीच्या आंदोलनाचा तुकडा समोर केला कि चालले लाळ घोटत , झेंडे घेऊन , मुर्दाबाद च्या घोषणा द्यायला ! या शेतकऱ्यांकडून तरी , ते बदलतील अशी काही अपेक्षा नाही.नवीन पिढीने तरी आपल्या बापाप्रमाणे वागू नये आणि डोके वापरून व्यवसाय करावा. 

याला काय उपाय आहे ?

याला एकमेव उपाय म्हणजे सरकारच्या ज्या काही योजना आहेत, त्या आपल्याच गावातील समजूतदार माणसाकडून समजून घ्या आणि त्याचा लाभ घ्या.
 नैसर्गिक शेती कडे वळा. व्यवसायाकडे निट पणे लक्ष द्या. उगाच आंदोलने , मोर्चे यामध्ये आपल्या व्यवसायाचा वेळ वाया घालवू नका...

अन्यथा येत्या काही वर्षातच आपली जमीन नापीक होईल,शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे "रोजचेच मढे त्याला कोण रडे "असे होऊन जाईल. अन्नाचा तुटवडा सुरु झाला तर हि उद्योजक मंडळी धावून येतील एक एक हजार एकर जमीन विकत घेतील , सेंद्रिय पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करून देशाची गरज उत्तम रीतीने भागवतील. 

तेंव्हा अन्नदात्यांनो , कृपया व्यवसाय नीट करा आणि आनंदाने जगा. आम्हाला आणि धरणी मातेला अन्न खाऊ घाला विष नाही. तेंव्हा आमचे देखील मनापासून आशीर्वाद आपणास लाभतील.

धन्यवाद !

जेवणात खावी भाकरीच..

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

*ज्वारीचे फायदे –*

*1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.*

*2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.*

*3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.*

*4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.*

*5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.*

*6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.*

*7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.*

*8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.*

*9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.*

*10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.*

ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.

ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर ( गोड ज्वारीपासून ) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषक मूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.

*तुम्हाला माहित नसलेले भाकरीचे प्रकार जाणून घ्या :-*

भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ आहे. सांज-सकाळ भाकऱ्या थापून त्यांच्या हाताला इतकी सवय झालेली असते, कि हातासरशी त्या भाकऱ्यांबरोबर, इतर दोन-चार प्रकार ही करुन टाकतात. पण तरी ते तंत्र सोपे नाही. नवीन शिकणाऱ्या व्यक्तीस, ते जमणे जरा कठिणच आहे. तरी ते काम सोपे पण नाहीच.

आपल्याकडे भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, मका, पटणी, नाचणी, तांदूळ अशी धान्ये वापरली जातात. या सर्व धान्यात ग्लुटेन अगदीच कमी असल्याने, या पिठाला चिकटपणा असा नसतोच, त्यामूळे उकड काढली तरच या भाकऱ्या लाटता येतात, नाहीतर त्या थापूनच कराव्या लागतात. त्यापुर्वी पिठ चांगले मळून घ्यावे लागते, तसेच तव्यावरच्या भाकरीवर नेमक्या वेळी आणि नेमकेच पाणी, फिरवावे लागते. त्यात अजिबात चूक होऊन चालत नाही. त्यामानाने खालील प्रकार सोपे आहेत.

भाकरीच्या पिठात थोडे उडीद पिठ किंवा कणीक मिसळून, थोडाफ़ार चिकटपणा आणता येतो, या युक्ती प्रमाणेच आणखी काही उपाय योजले जातात, यातले काही पारंपारीक आहेत. भाकरी करताना नवी व्यक्ती, पुर्ण आकाराची भाकरी करायला जाते. आणि तिथे अनेकदा फसते.  ८/९ इंच व्यासाची भाकरी करण्यापेचा ३/४ इंचाची भाकरी करणे, जास्त सोपे जाते. तवा मोठा
असेल, अशा २/३ भाकऱ्या एकाचवेळी भाजता येतात.

*१) ओतलेली भाकरी :-*

हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुन ही करता येते. एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची (सिमला मिरची) जरा तिखट असतेच पण हवी तर यात एखादी हिरवी मिरची चिरून घाला. थोड्या वेळाने हे चुरुन त्यात तांदळाचे (किंवा इतर ) पिठ घालून सरसरीत भिजवा. कणीक सोडून इतर पिठे वापरायची असतील तर नावाप्रमाणेच ओतता येईल, इतपत पाणी घाला. (कणकेसाठी थोडे वेगळे तंत्र वापरावे लागेल) गावठी तांदळाचे किंवा मोदकासाठी खास मिळते ते पिठ वापरले तर जास्त चांगले. आता पिठात चमचाभर तेल टाकून ढवळा. मग बिडाचा किंवा नॉन स्टीक तवा तापत ठेवा. त्यावर तेलाचा पुसटसा थर द्या आणि मग हे पिठ ओता. साधारण अर्धा सेमी जाड असू द्या. झाकण न ठेवता
मंद आचेवर दोन्ही बाजूने गुलाबी भाजा. कणीक वापरल्यास, थालिपिठापेक्षा थोडे सैल भिजवा. फॉइलचा एक तूकडा घ्या. त्याला तेलाचा पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापा. मग फ़ॉइलसकट पण भाकरी तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाका. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून घ्या आणि भाकरी भाजा. याच फ़ॉइलवर दुसरी भाकरी थापता येईल. पुढच्या सर्वच प्रकारासाठी हे तंत्र वापरता येईल.

*२) गाजराची भाकरी :-*

गाजराचे तूकडे करुन कूकरमधे उकडून मऊ करुन घ्या. त्यातले पाणी बाजूला करुन, गाजरे कुस्करून घ्या. कुसकरून गुठळ्या मोडल्या नाहीत तर एकदा ब्लेंड करुन घ्या. एक वाटी गर झाला तर त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (फ़्लेक्स) अर्धा टिस्पून टाका, त्यात मीठ टाका आणि साधारण वाटीभर कुठलेही पिठ मिसळा. पिठ थोडे कमी-जास्त लागेल पण पिठ सैलसरच असू द्या. लागल्यास बाजूला ठेवलेले पाणी वापरा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. या भाकरीला अप्रतिम रंग येतो, त्यातले चिली फ़्लेक्सही सुंदर दिसतात.

*३) कांदा भाकरी :-*

मोठा कांदा किसून घ्या. त्यात थोडे मीठ मिसळा. थोडी जिरेपूड टाका. आणि मग त्यात पिठ भिजवा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. कवडी दही, मिरची आणि हि भाकरी, फ़क्कड बेत जमतो.

*४) बटाटा भाकरी :-*

बटाटा बारीक किसणीने किसून घ्या. त्यात मीठ मिसळा, म्हणजे काळा पडणार नाही. मग एका बटाट्याला, एक टेबलस्पून घट्ट पण आंबट दही, एक टिस्पून जिरे आणि
आवडीप्रमाणे हिरवी वा लाल मिरची टाका. (मिरचीचे लोणचे वापरल्यास जास्त चांगले.) त्यात तांदळाचे पिठ मिसळून, सैलसर भिजवा. या पिठाची भाकरी तव्यावर डावेने पिठ पसरुन करता येते. (तितपत पिठ पातळ ठेवा)
हि भाकरी कुरकुरीत होते.

*५) वांग्याची भाकरी :-*

भरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या. मग ते सोलून त्या गरात हिरवी मिरची, एखादा कांदा घालून, मिक्सरमधून एकजीव करुन घ्या. मीठ व तेल घालून
त्यात पिठ ( ज्वारीच्या पिठाने चांगली चव येते, पण बाकीची पिठे चालतात,) मिसळा. हे पिठ मात्र चपातीच्या पिठाप्रमाणे घट्टसर हवे. याच्या लाटूनही भाकऱ्या करता येतात. लसणाच्या चटणीसोबत सुंदर लागतात.

*६) लसणाच्या पातीची भाकरी :-*

मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाही तरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो. १०/१५ दिवसात वीतभर पाती वाढतात. यासाठी तांदळाची उकड काढावी लागते. एक वाटी पिठ मोजून तयार ठेवावे. वरच्या पाती कात्रीने बारीक कापून घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ, थोडा हिंग आणि एक टिस्पून तेल टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पिठ पसरुन टाका. झाकण ठेवून एक वाफ़ येऊ द्या. मग गॅस बंद करा. दोन मिनिटाने त्यात लसणाच्या पाती (त्या कमी असल्या तर, थोडा लसूण बारीक चिरुन) टाका. पाण्याचा हात लावून मळून
घ्या. मग फॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. साजूक तूपासोबत छान लागतात.

*७) फ़णसाची भाकरी :-*

८/१० फ़णसाच्या गऱ्यातील बिया काढून घ्या. रसाळ (बरका) फ़णस असेल तर गरे मिक्सर मधून काढा, कापा असेल तर गरे वाफ़वून घ्या आणि मग मिक्सरमधून काढा. मग त्यात मिठाचा कण आणि तांदळाचे पिठ मिसळा. यात थोडे नारळाचे दूध घातले तर छान.
मग वरच्या तंत्रानेच भाकऱ्या करा.

*८) शेपूची भाकरी :-*

वरच्या लसणाच्या पातीच्या तंत्राने शेपूच्या भाजीच्या भाकऱ्या चांगल्या होतात. भाजी अगदी बारीक कापायची नाही, म्हणजे भाकरीवर छान नक्षी दिसते. या भाकरीवर कच्चे तेल घालून खाल्ले तर चांगले लागते.

*९) ऊसाच्या रसातली भाकरी (दशमी) :-*

ऊसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात. खालीवर केळीचे पान ठेवून तव्यावर ठेवायची. थोड्या वेळाने परतायची. दशमी तयार झाली, कि पान सुटे होते.
जाड फॉइल वापरुनही करता येते.

*१०) गुळाची भाकरी :-*

अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या लवकर करपतात. या भाकरीसोबत साजूक तूप चांगले लागते.

*११ ) सोया चंक्सची भाकरी :-*

एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत, मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून टोमॅटो प्यूरे किंवा २ टिस्पून केचप टाकावा. मग त्यावर मिन्स किंवा चंक्स बारीक करून घालावेत व वाफ़ येऊ द्यावी. आवडीप्रमाणे, तिखट
व गरम मसाला घालावा. मग ते मिश्रण थंड झाले कि त्यात कणीक घालून मळावे. याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या कराव्यात. डब्यात न्यायला या सोयीच्या आहेत. मुलांना पण देता येतील.

*१२) केळ्याची भाकरी :-*

जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरी प्रमाणेच भाकरी करता येते.