ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.
ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.
*ज्वारीचे फायदे –*
*1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.*
*2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.*
*3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.*
*4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.*
*5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.*
*6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.*
*7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.*
*8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.*
*9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.*
*10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.*
ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.
ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर ( गोड ज्वारीपासून ) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषक मूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.
*तुम्हाला माहित नसलेले भाकरीचे प्रकार जाणून घ्या :-*
भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ आहे. सांज-सकाळ भाकऱ्या थापून त्यांच्या हाताला इतकी सवय झालेली असते, कि हातासरशी त्या भाकऱ्यांबरोबर, इतर दोन-चार प्रकार ही करुन टाकतात. पण तरी ते तंत्र सोपे नाही. नवीन शिकणाऱ्या व्यक्तीस, ते जमणे जरा कठिणच आहे. तरी ते काम सोपे पण नाहीच.
आपल्याकडे भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, मका, पटणी, नाचणी, तांदूळ अशी धान्ये वापरली जातात. या सर्व धान्यात ग्लुटेन अगदीच कमी असल्याने, या पिठाला चिकटपणा असा नसतोच, त्यामूळे उकड काढली तरच या भाकऱ्या लाटता येतात, नाहीतर त्या थापूनच कराव्या लागतात. त्यापुर्वी पिठ चांगले मळून घ्यावे लागते, तसेच तव्यावरच्या भाकरीवर नेमक्या वेळी आणि नेमकेच पाणी, फिरवावे लागते. त्यात अजिबात चूक होऊन चालत नाही. त्यामानाने खालील प्रकार सोपे आहेत.
भाकरीच्या पिठात थोडे उडीद पिठ किंवा कणीक मिसळून, थोडाफ़ार चिकटपणा आणता येतो, या युक्ती प्रमाणेच आणखी काही उपाय योजले जातात, यातले काही पारंपारीक आहेत. भाकरी करताना नवी व्यक्ती, पुर्ण आकाराची भाकरी करायला जाते. आणि तिथे अनेकदा फसते. ८/९ इंच व्यासाची भाकरी करण्यापेचा ३/४ इंचाची भाकरी करणे, जास्त सोपे जाते. तवा मोठा
असेल, अशा २/३ भाकऱ्या एकाचवेळी भाजता येतात.
*१) ओतलेली भाकरी :-*
हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुन ही करता येते. एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची (सिमला मिरची) जरा तिखट असतेच पण हवी तर यात एखादी हिरवी मिरची चिरून घाला. थोड्या वेळाने हे चुरुन त्यात तांदळाचे (किंवा इतर ) पिठ घालून सरसरीत भिजवा. कणीक सोडून इतर पिठे वापरायची असतील तर नावाप्रमाणेच ओतता येईल, इतपत पाणी घाला. (कणकेसाठी थोडे वेगळे तंत्र वापरावे लागेल) गावठी तांदळाचे किंवा मोदकासाठी खास मिळते ते पिठ वापरले तर जास्त चांगले. आता पिठात चमचाभर तेल टाकून ढवळा. मग बिडाचा किंवा नॉन स्टीक तवा तापत ठेवा. त्यावर तेलाचा पुसटसा थर द्या आणि मग हे पिठ ओता. साधारण अर्धा सेमी जाड असू द्या. झाकण न ठेवता
मंद आचेवर दोन्ही बाजूने गुलाबी भाजा. कणीक वापरल्यास, थालिपिठापेक्षा थोडे सैल भिजवा. फॉइलचा एक तूकडा घ्या. त्याला तेलाचा पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापा. मग फ़ॉइलसकट पण भाकरी तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाका. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून घ्या आणि भाकरी भाजा. याच फ़ॉइलवर दुसरी भाकरी थापता येईल. पुढच्या सर्वच प्रकारासाठी हे तंत्र वापरता येईल.
*२) गाजराची भाकरी :-*
गाजराचे तूकडे करुन कूकरमधे उकडून मऊ करुन घ्या. त्यातले पाणी बाजूला करुन, गाजरे कुस्करून घ्या. कुसकरून गुठळ्या मोडल्या नाहीत तर एकदा ब्लेंड करुन घ्या. एक वाटी गर झाला तर त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (फ़्लेक्स) अर्धा टिस्पून टाका, त्यात मीठ टाका आणि साधारण वाटीभर कुठलेही पिठ मिसळा. पिठ थोडे कमी-जास्त लागेल पण पिठ सैलसरच असू द्या. लागल्यास बाजूला ठेवलेले पाणी वापरा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. या भाकरीला अप्रतिम रंग येतो, त्यातले चिली फ़्लेक्सही सुंदर दिसतात.
*३) कांदा भाकरी :-*
मोठा कांदा किसून घ्या. त्यात थोडे मीठ मिसळा. थोडी जिरेपूड टाका. आणि मग त्यात पिठ भिजवा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. कवडी दही, मिरची आणि हि भाकरी, फ़क्कड बेत जमतो.
*४) बटाटा भाकरी :-*
बटाटा बारीक किसणीने किसून घ्या. त्यात मीठ मिसळा, म्हणजे काळा पडणार नाही. मग एका बटाट्याला, एक टेबलस्पून घट्ट पण आंबट दही, एक टिस्पून जिरे आणि
आवडीप्रमाणे हिरवी वा लाल मिरची टाका. (मिरचीचे लोणचे वापरल्यास जास्त चांगले.) त्यात तांदळाचे पिठ मिसळून, सैलसर भिजवा. या पिठाची भाकरी तव्यावर डावेने पिठ पसरुन करता येते. (तितपत पिठ पातळ ठेवा)
हि भाकरी कुरकुरीत होते.
*५) वांग्याची भाकरी :-*
भरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या. मग ते सोलून त्या गरात हिरवी मिरची, एखादा कांदा घालून, मिक्सरमधून एकजीव करुन घ्या. मीठ व तेल घालून
त्यात पिठ ( ज्वारीच्या पिठाने चांगली चव येते, पण बाकीची पिठे चालतात,) मिसळा. हे पिठ मात्र चपातीच्या पिठाप्रमाणे घट्टसर हवे. याच्या लाटूनही भाकऱ्या करता येतात. लसणाच्या चटणीसोबत सुंदर लागतात.
*६) लसणाच्या पातीची भाकरी :-*
मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाही तरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो. १०/१५ दिवसात वीतभर पाती वाढतात. यासाठी तांदळाची उकड काढावी लागते. एक वाटी पिठ मोजून तयार ठेवावे. वरच्या पाती कात्रीने बारीक कापून घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ, थोडा हिंग आणि एक टिस्पून तेल टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पिठ पसरुन टाका. झाकण ठेवून एक वाफ़ येऊ द्या. मग गॅस बंद करा. दोन मिनिटाने त्यात लसणाच्या पाती (त्या कमी असल्या तर, थोडा लसूण बारीक चिरुन) टाका. पाण्याचा हात लावून मळून
घ्या. मग फॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. साजूक तूपासोबत छान लागतात.
*७) फ़णसाची भाकरी :-*
८/१० फ़णसाच्या गऱ्यातील बिया काढून घ्या. रसाळ (बरका) फ़णस असेल तर गरे मिक्सर मधून काढा, कापा असेल तर गरे वाफ़वून घ्या आणि मग मिक्सरमधून काढा. मग त्यात मिठाचा कण आणि तांदळाचे पिठ मिसळा. यात थोडे नारळाचे दूध घातले तर छान.
मग वरच्या तंत्रानेच भाकऱ्या करा.
*८) शेपूची भाकरी :-*
वरच्या लसणाच्या पातीच्या तंत्राने शेपूच्या भाजीच्या भाकऱ्या चांगल्या होतात. भाजी अगदी बारीक कापायची नाही, म्हणजे भाकरीवर छान नक्षी दिसते. या भाकरीवर कच्चे तेल घालून खाल्ले तर चांगले लागते.
*९) ऊसाच्या रसातली भाकरी (दशमी) :-*
ऊसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात. खालीवर केळीचे पान ठेवून तव्यावर ठेवायची. थोड्या वेळाने परतायची. दशमी तयार झाली, कि पान सुटे होते.
जाड फॉइल वापरुनही करता येते.
*१०) गुळाची भाकरी :-*
अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या लवकर करपतात. या भाकरीसोबत साजूक तूप चांगले लागते.
*११ ) सोया चंक्सची भाकरी :-*
एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत, मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून टोमॅटो प्यूरे किंवा २ टिस्पून केचप टाकावा. मग त्यावर मिन्स किंवा चंक्स बारीक करून घालावेत व वाफ़ येऊ द्यावी. आवडीप्रमाणे, तिखट
व गरम मसाला घालावा. मग ते मिश्रण थंड झाले कि त्यात कणीक घालून मळावे. याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या कराव्यात. डब्यात न्यायला या सोयीच्या आहेत. मुलांना पण देता येतील.
*१२) केळ्याची भाकरी :-*
जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरी प्रमाणेच भाकरी करता येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा